शुक्रवार, २५ मे, २०१२

मी माझ्यातला...


असे शब्दांना कितीदा कुरवाळीत बसायचे?
असे बरेचदा शब्दांनी आभाळ भरून आलं
पण ही धरीत्री मात्र
कोरडीच राहीली


बरच काही लिहायचं म्हणून
शब्द आसडून घेतले
हृदयातली आग पेटली तेव्हा
सगळे कसे करपून गेले



पुष्कळदा पाहिलय
भावनांची हेळसांड होताना
अजूनही गळा भाजून जातो
गारठलेलंही पाणी घोटताना

मी किनारा अजूनही सोडलाच नाही
सबंध बुडालो जेव्हा किनाराच उरला नाही..

मिटलेल्या पापण्यांचा क्षीण अजूनही विरला नाही
ओघळणार्‍या आसवांचा ओघ अजूनही सरला नाही
म्हणता म्हणता कितीक लोटला काळ
लोट अश्रूंचा कुणा अजूनही कळला नाही

कागदावर रेखाटलेल्या ओळींना
एक अर्थच हवा असं कुठे आहे?
या रेषा मनातील तरंग बनले तरी पुरे आहे..


मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

पुष्कळदा पाहिलंय..

पुष्कळदा पाहिलंय
भावनांची हेळसांड होताना
अजूनही गळा भाजून जातो
गारठलेलंही पाणी घोटताना

देव

देव

माणसांच्या खु-याड्यात
देव नवा ठाकला आहे
मनामनात आरती त्याची
पैसा त्याचं नाव आहे ||धॄ||
पैशाशिवाय काही चालत नाही...
नेहमीच  ऐकावं लागतं
पैशासाठी कधी स्वतःलाही
भर बाजारात विकावं लागतं
आज माणसांच्या बाजारात देवालाही भाव आहे||
       
आज नाती-गोती सगळीच
क्षणासाठीच असतात
पैसा नसला गाठीला की
ती क्षणभरातही फिरतात
आज पैसा बघून लग्नाची जीवनगाठही जोडत आहे||
पैसा नसतो सगळं म्हणून
रडतानाही पाहिलं
पैसा नसता जीवंतपणी
सडतानाही पाहिलं
आज चलनाविना दुबळे आम्ही जीवनही गहाण आहे||
ठाऊक आहे तुला-मला
भरपूर काही अनमोल आहे
हृदयाचा टाहो फुटला की
सर्वकाही फोल आहे
आज हृदय पिचून बघितलं सरणालाही किंमत आहे||

आई

आई

कळत-नकळतच्या चुकांसाठी
कधी आईनं मला मारायचं
मग तिनच शिवलेल्या वाकलीखाली
हळूच येऊन रडायचं
धुसमुस-धुसमुस वाकळीखाली
फक्त मी एकटा
भोवताली घट्ट काळोख
आतून चेहरा तापलेला
       
तिच्या चेहर्‍यावरचा राग आठवत
माझाही गाल फुगायचा
डोळ्यांसमोर डोळे दरडविताना
डोळा उगीच भरायचा
कधी हुंदका अनावर होत
गालही चिंब भिजायचे
मग स्वतःचीच समजूत काढत
गालावरून हात सरकायचे
वाकळीत घट्ट लपेटून असताना
मग दोन हात सरकायचे
कुशीत घट्ट ओढत
ह्ळूच पाट थोपटायचे
एक पदर अश्रू फुसत
हळूच ओला व्हायचा
गालावरचा फुगवा अन् डोळ्यांचा रूसवा
कुठच्याकुठे पळायचा
मग वाकळीखालीच ओल्या पदरानं
हळूवार काहीतरी गुणगुणायचं
ओल्या उबार्‍यात धुंद झोपताना
गालावर हसू खुलायचं
                           -अमर पवार